जून २०२० मध्ये, जेव्हा कोरोनामुळे नोकरी गमावलेला मराठी कोकणी समाज जेव्हा व्यवसायाकडे वळला – तेव्हा समाजाचे एक विचित्र चित्र निर्माण झाले होते. दिशाहीन आणि घरच्या परिस्थितीशी झुंज ठेऊन थकलेले, व्याकुळ झालेले अनेक उद्योजक कोकण विकास युवा मंचाचे प्रमुख श्री. अजय यादव यांच्या संपर्कात आले, त्यांची व्यथा समजताच सामाजिक प्रश्नांवर नेहमीच सकारत्मक उत्तरे शोधणाऱ्या कोकण विकास युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी “आपली हक्काची बाजारपेठ” या अजय यादव यांच्या संकल्पनेला दुजोरा दिला आणि त्यानुसार काम करण्यास सुरुवात झाली.
अगदी सुरुवातीच्या काळापासून कल्पक आणि महत्वाकांक्षी उद्दीष्टे समोर ठेवूनच कोकण बाजारची सुरुवात झाली – ज्यांनी सुरुवातीच्या काळापासून कोकण बाजार मंचाचे काम पाहिलेले आहे, त्यांना दोन वर्षात ५० कोकण बाजार यशस्वीरीत्या आयोजित झाल्याचे जराही नवल वाटणार नाही – त्यांना माहित आहे, इथे काहीतरी भन्नाट घडतय, आणि घडत राहणारच.